जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राजकीय अज्ञातवासात असलेले जेष्ठ नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांनी आज जळगाव दौऱ्यावर आलेल्या शिवसेना ठाकरे गट नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अचानक भेट घेतली.

जळगाव : राजकीय अज्ञातवासात असलेले जेष्ठ नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांनी आज जळगाव दौऱ्यावर आलेल्या शिवसेना ठाकरे गट नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अचानक भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाल्यानं जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
संजय राऊत हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असून ते आज सकाळी जळगाव विमानतळावर दाखल झाले. तिथेच सुरेशदादा जैन आणि राऊत यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, या अनपेक्षित भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान सुरेशदादा जैन यांनी भाजपाला सक्रिय पाठिंबा दिला होता. मात्र आता शिवसेना (ठाकरे गट) नेत्याशी त्यांच्या बैठकीने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव महापालिकेच्या पार्श्वभूमीवर नवीन समीकरण तयार होणार का?
जळगाव महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पाहता, सुरेशदादा जैन यांचा प्रभाव मोठा असून त्यांच्याभोवती एक मजबूत समर्थक वर्ग आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात ते ‘गेम चेंजर’ ठरु शकतात, असे जाणकारांचे मत आहे. संजय राऊत आणि जैन यांच्या या गूढ चर्चेमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकी काय झाली चर्चा?
संजय राऊत आमचे जुने मित्र आहेत. त्यामुळं सदिच्छा भेट घेतली. मात्र राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. राजकारणात पुन्हा सक्रीय होणार नसल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते सुरेश दादा जैन यांनी दिली आहे. तर सुरेश दादा आमची नेते व मार्गदर्शक आहेत. सुरेशदादा जैन अजून थकलेले नाहीत असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले. आगामी निवडणुकांच्या चर्चेबाबत "तुम्हाला कळेल " असे म्हणत राजकीय चर्चेबाबत संजय रावतांकडून सूचक संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा सुरेश जैन आणि संजय राऊत यांची ही भेट आगामी निवडणुका पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय बनला आहे.
माजी मंत्री सुरेश जैन यांची राजकीय कारकिर्द
माजी मंत्री सुरेश जैन यांची राजकीय कार्किर्द मोठी आहे. राजकीय जीवनात सुरेश दादा जैन यांनी विविध पदांवर काम केलं आहे. ते 1980 मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर जळगाव नगरपालिकेत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले. त्यात त्यांना यश मिळाले आणि जळगावचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 1985 मध्ये ते समाजवादी काँग्रेसतर्फे आमदार झाले. 1990 मध्ये सरतचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले. 1995 मध्ये काँग्रेसतर्फे तर 1999 मध्ये ते शिवसेनेतर्फे आमदार झाले. 2004 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते आमदार झाले. 2009 साली शिवसेनेतर्फे जळगाव विधानसभेतून आमदार झाले. 1980 पासून सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते सलग 34 वर्षे आमदार होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपद दिले होते.
महत्वाच्या बातम्या:
Suresh Jain : ना शिंदेंची शिवसेना, ना भाजप, ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा मोठा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
