Sanjay Pawar: ज्या निवडणुकीत शिवसेना फुटली, त्याच संजय पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेतून उपनेतेपदाचा राजीनामा; जिल्हाप्रमुख निवडीवरून मोठ्या उलथापालथी
विशेष म्हणजे 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. ही उमेदवारी थेट संभाजी राजे यांच्या विरोधात होती.

Sanjay Pawar resigns: कोल्हापूर शिवसेनेमध्ये अस्तित्वाचा संघर्ष सुरू असताना पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनाट्याने मात्र टोक गाठलं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटात नाराजीनाट्य सुरूच आहे. हर्षल सूर्व यांनी शहर समन्वयक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना उपनेते संजय पवार यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. ही उमेदवारी थेट संभाजी राजे यांच्या विरोधात होती आणि तेव्हाच शिवसेना फुटली होती आणि आता तेच संजय पवार जिल्हाप्रमुख निवडीने नाराज असून त्यांनी थेट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. संजय पवार यांनी इंगवले यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पदाचा राजीनामा दिला असला, तरी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून काहीतरी वेगळे घडत आहे
संजय पवार म्हणाले की, 1990 पासून मी शिवसैनिक म्हणून काम करत आहे. गेल्या 36 वर्षांपासून मी एकनिष्ठपणे काम केलं आहे. मातोश्रीवरुन जे जे आदेश आले त्याचे तंतोतंत पालन केलं आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून काहीतरी वेगळे घडत असल्याचे संजय पवार म्हणाले. दरम्यान जिल्हाप्रमुख निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासायला हवी होती असं संजय पवार यांनी नमूद केलं. संजय पवार यांनी विधानसभा निवडणुकीत षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की मधुरिमाराजे यांनी अचानक माघार का घेतली? राजू लाटकर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्यासाठी देखील शिवसेना राबली होती. मात्र विधानसभेला मधुरिमाराजे यांनी माघार का घेतली होती? हे भविष्यात समोर येईल असं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर उत्तरसाठी संजय पवार आणि रविकिरण इंगवले इच्छूक होते. याच उमेदवारीवरून दोघांमध्ये वाद वाढला होता.
उपनेत्याला माहिती नसेल तर काय करायचे?
कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र ही नियुक्ती करताना उपनेत्याला माहिती नसेल तर काय करायचे अशी विचारणा संजय पवार यांनी यावेळी केली. गेल्या काही दिवसांपासून संजय पवार आणि रवीकिरण इंगवले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादाचा ऑडिओ कॉल सुद्धा व्हायरल झाला होता. त्यावरून सुद्धा बरीच चर्चा झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेना ठाकरे गट अस्तित्वाच्या लढाईत आहे. सर्व नेते शिंदे गटात आणि पदाधिकारी ठाकरे गटात अशी स्थिती शिवसेना ठाकरे गटाची झाली आहे. मात्र पदाधिकाऱ्यांमधील वाद संपलेला नाही.
हक्काचे मतदारसंघही सुटले
दुसरीकडे, कोल्हापुरात हक्काचे मतदार संघ सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून सुटले आहेत. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र ती जागा काँग्रेसकडे आहे. कोल्हापूर लोकसभेची जागाही शाहू महाराजांसाठी शिवसेनेकडून काँग्रेसला सोडण्यात आली. कोल्हापूर उत्तर बदल्यामध्ये राधानगरी जागा देण्यात आली होती. मात्र, माजी आमदार के पी पाटील यांनी पुन्हा एकदा कोलांटउडी मारत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या