Ahmedabad Plane Crash: दहा बाय दहाच्या खोलीत राहिली, प्रचंड संघर्ष; अहमदाबाद क्रॅशमध्ये मृत्यू झालेल्या रोशनी सोनघरेचा मामा भावूक
Ahmedabad Plane Crash: रोशनीच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या घरात शोककळा पसरली आहे.

डोंबिवली : अहमदाबादमध्ये (ahmedabad plane crash) काल ( गुरूवारी 12 जून) झालेल्या भीषण विमान अपघातात 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. डोंबिवलीतील एअर इंडिया केबिन क्रू रोशनी सोनघरे हिचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात एकूण 265 प्रवाशांचा मृत्यू झाला असून रोशनीच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर (ahmedabad plane crash) कोसळला आहे. तिच्या घरात शोककळा पसरली आहे. रोशनीच्या मामांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनीचा संघर्ष अत्यंत प्रेरणादायी होता. प्रवीण सुखदरे असं तिच्या मामाचं नाव असून त्यांनी सांगितलं, “रोशनी ही आमच्या अंगा-खांद्यावर मोठी झाली. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी, 10 बाय 10 च्या छोट्याशा घरातून 1 BHK मध्ये आली आणि मेहनतीने एअर होस्टेस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.”
तिने सुरुवातीला स्पाईसजेटमध्ये नोकरी केली आणि दोन वर्षांपूर्वी एअर इंडिया मध्ये सहभागी झाली. अवघ्या चार दिवसांपूर्वी ती गावी आली होती. कुलदेवतेचं दर्शन घेतलं, नातेवाईकांना भेटली. नंतर अहमदाबाद येथे गेली होती. केवळ एक आठवड्यापूर्वी तिच्याशी लग्नाबाबत चर्चा झाली होती, आणि तिला तिच्या पसंतीनं लग्न कर असं घरच्यांची सांगितलं होतं. सध्या रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला पोहोचले आहेत. रोशनीच्या आईला लो बीपीचा त्रास असल्यामुळे अद्याप या दु:खद घटनेची पूर्ण माहिती त्यांना देण्यात आलेली नाही. संपूर्ण डोंबिवली शहरात शोकमय वातावरण आहे. या भीषण अपघातानंतर अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, रोशनीचा संघर्ष आणि यशाचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
तीच स्वप्न पूर्ण झालं
रोशनीचे मामा प्रवीण सुखदरे यांनी सांगितलं, रोशनी अंगाखांद्यावर मोठी झाली. 10 बाय 10 च्या खोलीतून तिचा प्रवास सुरू झाला. तिचं स्वप्न एअर होस्टेस बनायचं स्वप्न होतं. तिचे वडील टेक्निशियनचे काम करतात. तीच स्वप्न पूर्ण झालं. सुरुवातीला दोन वर्ष स्पाइस जेटमध्ये होती. त्यानंतर एअर इंडिया इथे कामाला लागली. ती दोन दिवसापूर्वी गावी आली होती. आजी आजोबा, काका काकी यांना भेटली. कुलदैवताचं दर्शन घेतलं. त्यानंतर घरी आल्यावर लगेच लंडनची फ्लाईट मिळाली. तिचं लग्न ठरलं नव्हतं. एक आठवड्यापूर्वीच माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. तुला जो मुलगा आवडेल त्याच्याशीच लग्न करू इतकं बोलणं आमचं झालं होतं. तिच्या आईला आत्ता काहीच सांगितलं नाही, तिला लो बीपी त्रास आहे. तीच छोटा भाऊ शीपवरती कामाला आहे. आता मोठी वाहिनी भाऊ आणि वडील अहमदाबादला गेले आहेत. डोंबवलीकरांनी खूप सहकार्य केलं, एअर इंडियाकडून अधिकृतरित्या कोणालाच फोन आला नाही. मात्र एअर इंडियाचे काही सहकारी अहमदाबादला कुटुंबासोबत आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
विमानात क्रू मेंबर्ससह 242 लोक
गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. विमानाचा काही भाग डीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवरही पडला, ज्यामुळे इमारतीचे बरेच नुकसान झाले.विमानात दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. या अपघातात क्रू मेंबर्ससह 241 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी माहिती दिली आहे की, एक व्यक्ती जिवंत आहे. विमान अपघातातून वाचलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.