Dog Attack : मालकिणीच्या हातून पट्टा सुटला अन् रॉटविलरची 4 महिन्यांच्या चिमुकलीवर झडप, लचके तोडून जीव घेतला, अंगावर काटा आणणारा Video

Dog Attack : या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये रात्री 9 वाजताच्या सुमारास, रॉटविलर कुत्रा त्याच्या मालकाच्या हातातून सुटतो आणि समोरील लोकांवर हल्ला करतो, ज्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण होतो.

Continues below advertisement

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एका रॉटविलर कुत्र्याच्या हल्ल्यात एका चार महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या राधे रेसिडेन्सीमध्ये सोमवारी (ता 12) रात्री  नऊ वाजण्याच्या सुमारास एका पाळीव कुत्र्याने अचानक 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला केला. या रॉटविलर जातीच्या पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात चार महिन्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

Continues below advertisement

हथिजन सर्कल येथील राधे रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या प्रतीक दाभी यांची 4 महिने 17  दिवसांची मुलगी ऋषिका हिला घेऊन त्यांची बहिणी घराबाहेर पडली होती. त्याच वेळी, जवळच राहणारी एक महिला तिच्या रॉटविलर पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर आली. ती महिला फोनवर बोलत असताना कुत्र्याचा पट्टा तिच्या हातातून निसटला आणि कुत्र्याने त्या चिमुकल्या मुलीवर आणि तिच्या मावशीवर प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे ज्यामध्ये रात्री 9 वाजताच्या सुमारास, रॉटविलर कुत्रा मालकाच्या हातातून सुटतो आणि अनियंत्रित होताना दिसतो. तो समोर असलेल्या लोकांवर हल्ला करतो, ज्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ होतो.

फुटेजमध्ये ऋषिका तिच्या मावशीच्या हातंमध्ये दिसत आहे. कुत्र्याच्या हल्ल्यादरम्यान, मुलगी तिच्या मावशीच्या हातातून जमिनीवर पडते आणि कुत्रा तिच्यावर क्रूरपणे हल्ला करतो. जवळच उभी असलेली एक महिला मुलीला वाचवण्यासाठी धावते आणि तिला कुत्र्यापासून वाचवते, तिला आपल्या मांडीवर घेते आणि तिथून दूर घेऊन जाते. यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अहमदाबाद महानगरपालिकेच्या नियमांनुसार, सर्व पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. आता हा रॉटविलर कुत्रा त्याच्या मालकाने महापालिकेत नोंदणीकृत केला होता की नाही हे तपासाचे विषय आहेत. मुलीच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांमध्ये संताप आहे. कुटुंबाने विवेकानंद पोलिस ठाण्यात कुत्र्याच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच, सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना एक अर्ज देऊन कुत्र्याच्या मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, हा कुत्रा बऱ्याच काळापासून त्रास देत आहे आणि अलिकडच्या काळात त्याने दोन लोकांना चावले आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. आता मुलीच्या मृत्यूनंतर लोक कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

या घटनेबाबत बुधवारी मंत्रिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि त्यावर दीर्घ चर्चा झाली. कॅबिनेट मंत्री ऋषिकेश पटेल म्हणाले की, चर्चेच्या शेवटी कुत्रे पाळण्यासाठीही नियम बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदाबाद महानगरपालिकेनेही येत्या काळात पाळीव कुत्र्यांसाठी नवीन धोरण आणण्याची तयारी सुरू केली आहे, जसे की पशु धोरण. महामंडळाच्या आदेशानुसार, 31मे पर्यंत पाळीव कुत्र्यांची नोंदणी न करणाऱ्यांना नोटीस बजावली जाईल. तसेच दंडाची रक्कमही वाढवली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »