Air India Plane Crash In Ahmedabad: होस्टेलवर विमान कोसळलं, पाचव्या मजल्यावर झोपलेली अकोल्याची ऐश्वर्या ब्लँकेट गुंडाळून धावली, आग-धुरातून थरारक सुटका
Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. विमान होस्टेलच्या इमारतीवर जेव्हा कोसळलं, तेव्हा नेमकं काय घडलं?
Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघातात (Air India Plane Crash In Ahmedabad) अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकती आहे. पाचव्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वत:भोवती ब्लँकेट लपेटून तिने स्वतःचा जीव वाचवला आहे. ऐश्वर्या तोष्णीवाल अकोल्यातील दुर्गा चौक येथील रहिवाशी आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथे बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अकोल्याची मुलगी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. अपघाताच्यावेळी ती होस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. त्या परिस्थितीतही ऐश्वर्याने धीर न सोडता धुराच्या गर्दीतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला.
ट्रेंडिंग
ऐश्वर्याने स्वतःला चादरीत लपेटलं अन्...
ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती काल सकाळीच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली. उठून पाहिलं तर सर्वत्र धुराच धूर होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच ऐश्वर्याने स्वतःला चादरीत लपेटलं आणि अंधार व धुराच्या गर्दीतून मार्ग शोधत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. या दरम्यान ऐश्वर्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याचे निशाण आले.
मुलीचा फोन येताच वडील हादरुन गेले-
घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने लगेच आपल्या वडिलांना अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. ते त्या वेळी अकोल्याच्या दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच ते हादरून गेले आणि दुकान बंद करून तात्काळ घरी गेले. अमोल तोष्णीवाल यांनी सांगितले, टीव्हीवर बातम्या पाहताच आमचं डोकंच सुन्न झालं. पण देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून बचावली.
आजी-आजोबा यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले-
आई माधुरी तोष्णीवाल आणि आजी-आजोबा यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. आजोबा म्हणाले, पोती आमच्या वाढदिवसासाठी आली होती, पण अशा अपघाताला तिला सामोरे जावे लागले. देवाचे शंभर वेळा आभार की ती सुखरूप आहे. हादरलेल्या तोष्णीवाल कुटुंबीयांनी या दुर्घटनेत जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. ऐश्वर्या म्हणाली, माझ्या आयुष्यातला हा सर्वात भयावह अनुभव होता, जो मी कधीच विसरू शकणार नाही.
गुजरातमधील विमान अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू-
गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे.