Suresh Dhas Son Car Accident: भाजप आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारने व्यावसायिकाला कसं उडवलं? रात्री नगर रोडवर काय घडलं ?
सागर धस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मतदारसंघात सुरेश धस यांच्या अनुपस्थितीत विविध सामाजिक कार्यक्रमात सागर धस याचा सक्रिय सहभागा पाहायला मिळतो.

Suresh Dhas Son Car Accident: अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे काल 7 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या एम.जी. ग्लॉस्टर कारने (MH 23 BG 2929) एका दुचाकीला धडक दिली. यात झालेल्या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय 34) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुपा पोलीस ठाण्यात सागर धस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अपघाताच्या वेळी नेमकं झालं काय?
मृत नितीन शेळके हे सह्याद्री खादी हॉटेलवरून आपल्या गावाकडे दुचाकीवरून निघाले होते. जातेगाव फाटा येथे महामार्गावर यु-टर्न घेत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. जी. ग्लॉस्टर कारने सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली . ही गाडी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाची आहे .
भरधाव कारची धडक, बाईकस्वार फरफरत गेला
शेळके हे मोटारसायकलवरून यु-टर्न घेत असताना भरधाव कारने जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत नितीन शेळके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय .अपघातात दुचाकीवर असलेले नितीन शेळके रस्त्यावर दूरवर फरफटत गेले . अपघातात गंभीर जखमी झाल्याने स्थानिकांनी त्यांना तातडीने सुपा येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुरेश धसच्या मुलाला अटक
घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचालक सागर धस व त्याच्यासह एका मित्राला ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. 8 .जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले . त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Who Is Sagar Dhas : कोण आहे सागर धस?
सागर धस हा आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान सागर धस याने वडिलांसाठी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि प्रचाराची धुरा सांभाळली. सागर धसचे शिक्षण पुण्यात झालं आहे. सागर हा आष्टी मतदारसंघात युवा नेता म्हणून ओळखला जातो. मतदारसंघात सुरेश धस यांच्या अनुपस्थितीत विविध सामाजिक कार्यक्रमात सागर धस याचा सक्रिय सहभागा पाहायला मिळतो.
हेही वाचा :