Neha Malik House Robbed: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरातून 34 लाखांचे दागिने लंपास; घरकाम करणाऱ्या महिलेचा प्रताप, पोलिसांनी तात्काळ मुसक्या आवळल्या
Neha Malik House Robbed: अभिनेत्री नेहा मलिकच्या घरात चोरी झाली असून तब्बल 34 लाखांचे दागिने लंपास केले होते.
Neha Malik House Robbed: अभिनेत्री आणि मॉडेल नेहा मलिकच्या (Neha Malik) घरी चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणाची तक्रार मुंबईतील (Mumbai) आंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीने तिच्या 37 वर्षीय मोलकरीन शहनाज मुस्तफा शेखवर चोरीचा आरोप केला आहे. ही घटना 25 एप्रिल रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. एफआयआरचा हवाला देत अहवालात दावा केला जात आहे की, मोलकरणीनं परिस्थितीचा फायदा घेत अभिनेत्रीच्या घरातून सोन्याचे दागिने चोरले, ज्याची किंमत सुमारे 34.49 लाख रुपये आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
एफआयआरनुसार, नेहा मलिकची आई मंजू कधीकधी कार्यक्रमांमध्ये सोन्याचे दागिने घालायची आणि घरी परतल्यानंतर ती ते काढून तिच्या बेडरूममध्ये असलेल्या लाकडी ड्रॉवरमध्ये ठेवायची. ज्या ड्रॉवरमध्ये त्या दागिने ठेवायच्या त्याला लॉक नव्हता. घरात काम करणाऱ्या मोलकरणीला हे ठाऊक होतं. नेहा मलिकची आई मंजू या अनेकदा मोलकरणीसमोरच दागिन काढून त्या ड्रॉवरमध्ये ठेवायच्या. अशातच तिनं नजर ठेवून दागिने चोरले. नेहा मलिकच्या घरात काम करणारी मोलकरीण शहनाज मुस्तफा शेख मालाड पश्चिमेला राहते.
ट्रेंडिंग
अभिनेत्री नेहा मलिकच्या आईने मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घरातून 34 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेली असल्याची तक्रार मायलेकींनी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र वेगानं फिरवली. अंबोली पोलीस ठाण्यानं आरोपी शेनाज शेखविरुद्ध बीएनएसच्या कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि तिला अंधेरीतील जेबी नगर इथून अटक केली. तसेच, तिच्याकडून पोलिसांनी चोरीचे दागिने जप्त केले आहेत.
अभिनेत्री नेहा मलिक आणि तिची आई मंजू मलिक (वय 65) अंधेरी पश्चिमेकडील फोर बंगलो येथील अदानी हाइट्स कॉम्प्लेक्समध्ये राहतात. आरोपीचं नाव शहनाज शेख (37) असं आहे. ती फेब्रुवारीपासून अभिनेत्रीच्या घरी काम करत होती.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार मंजू मलिक नेहमीप्रमाणे घटनेच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता गुरुद्वारात गेली. शहनाज नेहमीप्रमाणे सकाळी 7.30 वाजता आली आणि तिनं भाडं भरण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचं सांगून बेडरूम आणि आरसे पूर्णपणे साफ करुन देते, असं सांगितलं. मंजू यांनी तिला 9000 रुपये आगाऊ दिले. त्यानंतर मोलकरणीला काय कामं करायचीत, हे सविस्तरपणे सांगून मंजू गुरुद्वारात जाण्यासाठी निघून गेल्या. सकाळी 9 वाजता त्या परत आल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र, शहनाज कामावर आली नाही. मंजू यांनी काळजीनं तिला फोन केला पण, तिचा फोन सतत बंद येत होता. काहीतरी संशयास्पद वाटल्यानं मंजू यांनी दागिने ठेवत असलेला ड्रॉवर तपासला. त्यावेळी त्यातून दागिने गायब असल्याचं आढळून आलं.
मंजू यांनी ताबडतोब त्यांची मुलगी नेहा मलिकला या घटनेची माहिती दिली. घरातून सोने आणि पैसे गायब असून मोलकरणीशिवाय दुसरं कुणीच घरात आलं नसल्याचंही सांगितलं. तसेच, दागिने नेमके कुठे असतात, हे शहनाजला माहीत असल्यामुळे तिनंच हे काम केल्याचा संशय मंजू यांना आला. मायलेकींनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेतला आणि तपासात असं आढळून आलं की, मोलकरीण अंधेरी परिसरात राहते, त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. तसेच, तिच्याकडून चारलेले दागिनेही जप्त केले.