Nashik Crime : जुन्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी; आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात गेला अन्..., नाशिक हादरलं!
Nashik Crime : नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथे एकाचा खून करण्यात आला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Nashik Crime : नाशिक शहरात हत्येचे सत्र सुरूच सुरूच आहे. काल मध्यरात्री नाशिकरोड (Nashikroad) परिसरातील जेलरोड (Jailroad) भागात एकाचा खून करण्यात आला आहे. तर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. रितेश डोईफोडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिकरोड पोलिसांना (Police) शरण आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील जेलरोड या ठिकाणी दोन तरुणांवर मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. ह्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे.
एकाचा मृत्यू एक गंभीर
जुन्या भांडणाची पुरात काढून रितेश डोईफोडे आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. डोक्यात दगड घालून धारदार शस्त्राने वार करत केलेल्या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी आहे.
हल्लेखोर स्वतः पोलीस ठाण्यात हजर
रितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हल्लेखोर स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
नाशिकरोड भागात घरफोडी करणारे आरोपी अटकेत
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे. दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामधून चार घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहे. सिन्नरफाटा सिटीलिंक रोड परिसरात दोन इसम संशयास्पदरीत्या फिरत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. सिटीलिंक बस डेपो परिसरात एका रिक्षाजवळ संशयित हालचाली करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पाहताच ते पळू लागले. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. चौकशीत त्यांनी आपली नावे साजिद हसन खान आणि निखिल चंद्रकांत पेटारे अशी सांगितली. त्यांच्याकडून सोन्याचे तुकडे आणि अन्य ऐवज जप्त करण्यात आला असून एकूण 2,89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील चार घरफोडी प्रकरणे उघडकीस आली आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
